बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मुंबईसह ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भाला मात्र प्रतीक्षा
नागपूर: जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील हवामानात वेगाने बदल होत असून, कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकणातील ६ जिल्ह्यांना आज (बुधवारी) 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भाला मात्र अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

ताशी ५० किमी वेगाने वारे वाहणार; मुंबई-कोकणात इशारा
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. यावेळी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात उकाडा आणि तापमान वाढले होते, मात्र या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मते, २० जुलैनंतर राज्यात व्यापक स्वरूपाचा मुसळधार पाऊस पुन्हा सुरू होईल.
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती?
· पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. पुण्यात १७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.
· उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. जळगाव जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहू शकते, तर अहिल्यानगरमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.
मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत १५ आणि १६ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांच्या ओढानंतर या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.




