बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलीस...; परभणीतील मेळाव्यावरून मनोज जरांगेंचा संताप, मुंबईत बदला घेण्याचा इशारा

बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलीस...; परभणीतील मेळाव्यावरून मनोज जरांगेंचा संताप, मुंबईत बदला घेण्याचा इशारा

परभणी: ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बंडू जाधव यांच्यातील वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा तत्काळ रद्द करावा, अन्यथा मी स्वतः परभणीत येईन असा थेट इशारा जरांगे यांनी दिला होता. मात्र, खासदार बंडू जाधव यांनी हा इशारा झुगारून मेळावा घेण्यावर ठाम भूमिका घेतली आहे.

 

मनोज जरांगे यांनी फोनवर संपर्क साधूनही बंडू जाधव यांनी माघार घेतली नाही. "रात्री सांगितले असते तर मेळावा रद्द केला असता, पण आता लोक स्टेडियमवर जमा झाले आहेत," असे स्पष्ट करत जाधव यांनी परभणीच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आणि मेळाव्याच्या ठिकाणी रवाना झाले.

या प्रकारानंतर संतापलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. जरांगे म्हणाले, "हा मेळावा रद्द न करून बंडू जाधवने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. जर परभणीत हा मेळावा झाला, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आता हा कार्यक्रम झालाच, तर याचा बदला आम्ही मुंबईत घेऊ."

दरम्यान, जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खासदार बंडू जाधव यांच्या घराबाहेर आणि परभणीतील स्टेडियम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.