बचत गटांसाठी महत्त्वाची बातमी ! मिनी ट्रॅक्टर योजनेची मुदत वाढली; १७ जुलैपर्यंत करता येणार अर्ज
कोल्हापूर/ प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजनेसाठी आता अर्ज करण्यास १७ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली.

यापूर्वी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी इच्छुक बचत गटांना अर्ज सादर करण्यास ३ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेली अतिवृष्टी आणि महा ई-सेवा केंद्रांचा संप यामुळे इच्छुक लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, प्रशासनाकडे अत्यंत अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते.
बचत गटांची ही अडचण लक्षात घेऊन आणि जास्तीत जास्त पात्र घटकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाने ही मुदत आता १७ जुलैपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे करवीर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांनी या वाढीव मुदतीचा लाभ उठवून आपले अर्ज विहित वेळेत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.




