भाजपचे खासदार झाले, पण अवघ्या 5 वर्षांत राजकारणाला रामराम
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. अनेक वर्षांपूर्वी अभिनयासोबत त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर गुजरातमधील अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून विजय मिळवत ते खासदार बनले. मात्र, केवळ पाच वर्षांनंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली. आता त्यांनी या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

विकी ललवानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना परेश रावल म्हणाले की, राजकारण हे पूर्णवेळ समर्पण मागणारं क्षेत्र आहे. अभिनय आणि राजकारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी प्रभावीपणे सांभाळणं शक्य नसल्याचं त्यांना जाणवलं. सततचा प्रवास, जबाबदाऱ्या आणि कामाच्या ताणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला.
ते म्हणाले, "राजकारणात गेल्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मला आधीपासूनच ब्लड प्रेशरचा त्रास होता, पण नंतर औषधांचं प्रमाण वाढलं. लोकांना वाटतं राजकारण्यांचं आयुष्य आरामदायी असतं, पण प्रत्यक्षात तिथे प्रचंड मेहनत आणि सतत धावपळ असते."
परेश रावल यांनी पुढे सांगितलं की, ते सुरुवातीपासूनच मर्यादित काळासाठी राजकारणात आले होते."हे माझं क्षेत्र नाही. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला पूर्णपणे त्या कामासाठी वाहून घ्यावं लागतं. पूर्ण वेळ देता येत नसेल, तर त्या क्षेत्राला न्याय देता येत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.सध्या परेश रावल यांनी राजकारणापासून पूर्णपणे दूर राहत पुन्हा अभिनयावर लक्ष केंद्रित केलं असून, त्यांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.




