‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ म्हणत मोदींनी नेमकं कोणाला संदेश दिला? उद्धव ठाकरेंचा घणाघाती सवाल

‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ म्हणत मोदींनी नेमकं कोणाला संदेश दिला? उद्धव ठाकरेंचा घणाघाती सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : “चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.” हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहात का? की अमित शाहांना हा संदेश देत आहात?, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वी हे मिंधे जात होते तेव्हा आपल्या शाहसेनेच्या प्रमुखाला भेटायचे. आता शाहसेनेच्या प्रमुखाला भेटण्याची त्यांना गरज नाही, कारण त्यांचा बहुतेक बॉस बदलला आहे. आता ते थेट मोदींना भेटतात. विशेष म्हणजे अमित शाह दिल्लीत असतानाही ते मोदींची भेट घेत आहेत.

“भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे,” हा धमकीवजा संदेश मोदींनी सर्वोच्च न्यायालयाला दिला आहे का? की अमित शाहांना? की देवेंद्र फडणवीसांना? की प्रशासनाला? हा संदेश नेमका कोणासाठी आहे?, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. या भेटीत मोदींनी “भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे,” असं सांगितल्याचं समोर आलं होतं. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या केसची सुनावणी सुरू असताना, जे पंतप्रधान Gen Z ला भेटले नाहीत, ते गद्दारांना भेटत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की, “भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे.” हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह आहे. याची दखल आम्ही घेत आहोतच, पण जनतेने आणि सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घ्यायला हवी. नेमकं हे कोणाला सांगितलं?, असा सवाल त्यांनी केला.

“भिऊ नका” हा संदेश इतर पक्षांमधील भविष्यातील गद्दारांनाही दिला आहे का? म्हणजे गद्दारी करा, आमच्याकडे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिला जातोय का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मोदींनी हा संदेश नेमका कोणाला दिला, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस लोकशाहीचा जीव घेत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. संविधान आणि लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या देशातील नागरिकांनी ही लढाई एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचं आवाहनही त्यांनी केलं.

देशातील तरुणांचं माथं भडकलं आहे आणि ते आता अशा प्रवचनांना ऐकायला तयार नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हा मुद्दा आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास नक्की आणून देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मात्र, मोदींनी सांगायला हवं की हा धमकीवजा संदेश त्यांनी नेमका कोणाला दिला? आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलं आहे?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला. “वॉशिंगमध्ये धुऊन घेतल्यानंतरही तुम्ही पुन्हा का घाबरता? आणि शेपट्या घालून मोदींकडे का जाता?”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.