मनपा क्रीडा समिती निवडणूक : दोन्ही पदांसाठी निघाली चिठ्ठी; सभापती भाजपचा तर उपसभापती काँग्रेसचा

मनपा क्रीडा समिती निवडणूक : दोन्ही पदांसाठी निघाली चिठ्ठी; सभापती भाजपचा तर उपसभापती काँग्रेसचा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रीडा समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत आज मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. दोन्ही पदांसाठी समसमान मते पडल्याने अखेर चिठ्ठी काढून ही निवड करण्यात आली. यात सभापती पदी भाजपचे विजयसिंह खाडे-पाटील, तर उपसभापती पदी काँग्रेसचे रोहित कवाळे विजयी झाले आहेत.

अप्पर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक पार पडली. सभापती पदासाठी भाजपचे खाडे-पाटील आणि प्रशांत खेडकर यांच्यात लढत झाली. हात वर करून झालेल्या मतदानात दोघांनाही ४-४ अशी समान मते मिळाली. अखेर मनपा शाळेच्या विद्यार्थिनीने काढलेल्या चिठ्ठीत खाडे-पाटील यांचे नशीब चमकले.

असाच प्रकार उपसभापती पदाच्या निवडणुकीतही घडला. रोहित कवाळे आणि अश्किन आजरेकर यांना समान मते पडल्याने पुन्हा चिठ्ठी काढण्यात आली, ज्यामध्ये काँग्रेसचे रोहित कवाळे यांची उपसभापती निवड झाली. या निवडीनंतर महापौर रुपाराणी निकम यांच्यासह सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.