मराठा महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

मराठा महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्याची तक्रार जालना शहर पोलिसांकडे देण्यात आली होती. यावेळी मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यानंतर दोन समाजांविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि महिलांना लज्जा वाटेल, अशा प्रकारचं वक्तव्य केल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती जालन्याचे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

नवनाथ वाघमारे यांनी यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख केला होता. ओबीसी नेत्यांची गोंडस मुलं पाहून मराठा समाजातील तरुणी त्यांच्या घरात घुसतात, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसंच, बावनकुळे यांनी स्वतः सांगितलं की, माझी सून मराठा आहे आणि माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील, असंही ते म्हणाले होते.

फक्त बावनकुळे यांच्याच नाही, तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठा समाजातील मुली गेल्या आहेत, असा दावाही नवनाथ वाघमारे यांनी केला होता. ओबीसी नेत्यांची मुलं, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरात लग्न करून जातात, अशा आशयाची टिप्पणी त्यांनी केली होती.

दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी खेद व्यक्त केला आहे. आपल्याकडून यापूर्वी कधीही अशा प्रकारचं वक्तव्य झालं नव्हतं. बावनकुळे यांच्यावर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ओघात हे वक्तव्य झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावं, असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं. तसेच मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ, मुंडे बंधू-भगिनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या शिवीगाळीच्या प्रकरणी मनोज जरांगे कधी माफी मागणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नवनाथ वाघमारे यांच्या वादग्रस्त विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. मी कितीही आक्रमक बोललो तरी कधी कोणाच्या महिलांवर किंवा लेकी-बाळींवर बोलत नाही. मी कोणाच्या समाजाबाबतही बोलत नाही. मात्र, तुम्ही मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलून अत्यंत वाईट पातळी गाठली आहे, अशी टीका जरांगे यांनी केली.

जो मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलेल, त्याला यापुढे कोणालाही सुट्टी नाही. तुमची दुसरी बाजू आणि काय कारनामे आहेत, ते दाखवायचे का? मराठ्यांची मुलंही सोपी नाहीत. आता मराठेही तुम्हाला याच भाषेत उत्तर देतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.