मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई; आरटीओचं वायूवेग पथक जागेवरच बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई; आरटीओचं वायूवेग पथक जागेवरच बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नसेल, तर त्यांच्यावर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. या शासन निर्णयासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस भूमिका घेतली असून, कारवाईचा इशाराही दिला आहे. याच मुद्द्यावर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठी न येणाऱ्या चालकाला सुरुवातीला एक महिन्याची नोटीस देऊन भाषा शिकण्याची संधी दिली जाईल. नोटीस देऊनही मराठी न शिकल्यास चालकाचं लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित केलं जाईल. त्यानंतरही नियमाचं पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुढे बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत 1 लाख 65 हजार अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. 1989 च्या नियमानुसार मराठी अनिवार्य आहे. मुंबई सर्वांना कुशीत घेऊन पुढे जाते. उद्यापासून म्हणजेच 20 ऑगस्टपासून कारवाईला सुरुवात करू. रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, मात्र मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं आहे. काहींनी व्हिडीओ प्रकाशित करून मराठी बोलणार नसल्याची मग्रुरी केली, कायद्यानुसार आता त्यांच्यावर कारवाई करू, असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

अशातच, मराठी शिकली नाही तर कारवाई अटळ आहे. व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करून त्याला लायसन्स आणि बॅच दिली जाईल. लायसन्स देताना डोमिसाईलही तपासावं लागेल. आरटीओचं वायूवेग पथक आहे. ज्यांच्याकडे मराठी प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट नाही आणि मराठीही बोलता येणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध करत उत्तर भारतीय रिक्षाचालक संजय दुबे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जो उत्तर भारतीय रिक्षाचालक मराठी बोलणार नाही, त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. पण मी रिक्षा पण चालवणार, पैसेदेखील कमावणार आणि मराठीही बोलणार नाही. जा... मराठी बोलणार नाही...’ असं त्याने म्हटलं आहे.

यावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, काही रिक्षाचालकांनी मुजोरपणा दाखवला आहे. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. कायद्यात राहून कारवाई करणार. मग्रुरी आणि मुजोरीला आम्ही कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देऊ, असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.