महापौरांच्या 'जनता दरबारात' तक्रारींचा पाऊस; ३३ नागरिकांचे अर्ज दाखल, तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

महापौरांच्या 'जनता दरबारात' तक्रारींचा पाऊस; ३३ नागरिकांचे अर्ज दाखल, तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्या तातडीने सोडवण्यासाठी महापालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत 'जनता दरबाराचे' आयोजन करण्यात आले होते. दर महिन्याच्या ५ तारखेला होणारा हा दरबार, रविवारी सुट्टी असल्याने आज ६ जुलै रोजी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडला.

या जनता दरबारात कोल्हापूरकरांनी आपल्या विविध समस्या मांडत एकूण ३३ अर्ज दाखल केले. महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच, नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी तक्रारी थोडक्यात मांडण्याच्या सूचना दिल्या आणि जुन्या तक्रारी पुन्हा न घेण्याचे स्पष्ट केले.

या जनता दरबारात आलेल्या ३३ अर्जांपैकी सर्वाधिक ११ अर्ज नगररचना विभागाशी संबंधित होते. याशिवाय:

  • उद्यान विभाग: ४ अर्ज
  • मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालय: ३ अर्ज
  • उप-आयुक्त आणि शहर अभियंता कार्यालय: प्रत्येकी २ अर्ज
  • पाणीपुरवठा, घरफाळा, परवाना आणि इतर विभागांचेही अर्ज प्राप्त झाले.

महापौरांनी प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आणि त्या निकाली काढण्याचे कडक आदेश दिले आहेत. अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.

या महत्त्वपूर्ण जनता दरबाराला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा. आयुक्त राम काटकर यांच्यासह महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.