माझ्याकडे फक्त दोनच पर्याय होते; उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांनी दिलं स्पष्टीकरण

माझ्याकडे फक्त दोनच पर्याय होते; उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर मागे घेतले आहे. मध्यरात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वतः एक्सवरील पोस्टद्वारे दिली.

मात्र, उपोषण मागे घेतल्यानंतरही आंदोलनाचा मुद्दा संपलेला नाही. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असून, तोपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे.

उपोषण संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक यांनी आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. मात्र, हा मुद्दा संसदेत चर्चेसाठी घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

वांगचुक म्हणाले,"माझ्याकडे फक्त दोनच पर्याय होते—उपोषण सुरू ठेवून जीव धोक्यात घालणे किंवा जिवंत राहून पुढचा संघर्ष सुरू ठेवणे. हजारो लोकांनी माझे जीवन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे मी संघर्ष सुरू ठेवण्यासाठी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

ते पुढे म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, उलट त्यांचीच राजकीय जबाबदारी वाढेल. तसेच, विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल होऊ नयेत, ही आपली सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोनम वांगचुक यांनी सांगितले की, NEET पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. तसेच, देशातील परीक्षा व्यवस्थेतील उत्तरदायित्व आणि सुधारणा या विषयावर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासन सरकार आणि विविध राजकीय पक्षांच्या खासदारांकडून मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.