मुंबई महापालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेताना अटक; ACB ची मोठी कारवाई

मुंबई महापालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेताना अटक; ACB ची मोठी कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील अंधेरी परिसरात बृहन्मुंबई महापालिकेच्या जलविभागातील एका अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

अंधेरी पश्चिमेतील के/पश्चिम विभागातील जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड याला ACB ने अटक केली. तक्रारदाराने दुकानासाठी पाण्याचे मीटर आणि नव्याने नळ जोडणीसाठी अर्ज केला होता. या कामासाठी सुरुवातीला 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम 80 हजार रुपयांवर ठरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पहिल्या हप्त्यात 40 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदाराने ACB कडे तक्रार केली. पडताळणीत जलमापक निरीक्षक नंदन बाळकृष्ण मोरे यांनी ही रक्कम विनोद राठोड यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर ACB ने अंधेरीतील एस. व्ही. रोड परिसरात सापळा रचून विनोद राठोड यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पाण्याची जोडणी आणि मीटर ही नागरिकांची मूलभूत सेवा असतानाही अशा कामांसाठी लाचेची मागणी होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यभर ACB कडून सातत्याने अशा कारवाया होत असल्या, तरीही लाचखोरीच्या घटना समोर येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.