‘मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!’ ‘चंद्रावरही एवढे खड्डे नसतील’ भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था; चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद

‘मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!’ ‘चंद्रावरही एवढे खड्डे नसतील’ भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था; चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!’ अशी साद टेंभवलीतील चिमुकल्यांनी घातली आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या दुरवस्थेवर संतापलेल्या गावकऱ्यांचा सवाल आहे की, ‘आम्ही ठाणे जिल्ह्यात राहतोय की भिवंडी तालुक्यात?’ आम्हाला तर वाटायला लागलंय की आम्ही चंद्रावर राहतोय. चंद्रावर एवढे खड्डे नसतील, तेवढे खड्डे आमच्या रस्त्यावर आहेत.

टेंभवली–खारबाव रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे आणि खोल खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साद घातली आहे.

पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही, तर खचलेल्या भागातून वाहन चालवताना चालकांची मोठी कसरत होत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘या रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार कोण?’ असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

रुग्णांना रुग्णालयात नेण्यापासून शेतमालाची वाहतूक करण्यापर्यंत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

टेंभवली–खारबाव रस्ता 34 ते 40 गावांसाठी महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि प्रवाशांना बसत आहे. खड्ड्यांमधील पाणी आणि चिखल वाहनांच्या चाकांमधून विद्यार्थ्यांच्या अंगावर उडतो. गणवेश माखतो, तर खड्ड्यांमुळे शाळेत पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे चिमुकल्यांनी आता थेट मुख्यमंत्री काकांकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.

“मुख्यमंत्री काका, रस्त्यावर खूप मोठे खड्डे आहेत. चिखल आमच्या अंगावर उडतो, कपडे माखतात आणि आम्हाला शाळेत जायला उशीर होतो. कृपया आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या आणि हा रस्ता लवकर दुरुस्त करा,” अशी भावनिक विनंती चिमुकल्यांनी केली आहे.गावकऱ्यांचा ‘चंद्रावरचा’ सवाल आणि चिमुकल्यांची ‘मुख्यमंत्री काका’ यांना साद आता प्रशासनापर्यंत पोहोचणार का? आणि टेंभवली–खारबाव रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? याकडे 35 ते 40 गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.