मुख्यमंत्र्यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी दिली मुदतवाढ; जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज? मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी दिली मुदतवाढ; जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज? मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार ‘नाराजीनाट्य’ रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्याने होत असलेल्या घणाघाती वक्तव्यांमुळे सरकारमधील काही मंत्री नाराज असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ देण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या काही मंत्र्यांमध्येही नाराजी असल्याचं समोर येत आहे. या दोन प्रमुख मुद्द्यांवरून उद्याच्या बैठकीत जोरदार चर्चा होण्याची शक्यता वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या भूमिकेवर आणि थेट मंत्र्यांवर सातत्याने टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघात करत आहेत. यामुळे समाजासमोर सरकारची प्रतिमा खराब होत असल्याची भावना काही मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांच्याशी योग्य आणि थेट समन्वय राहावा, यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करावेत, असा सूर काही मंत्र्यांमध्ये उमटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दुसरीकडे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

काही दिवसांपूर्वी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मराठी शिकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी मान्य करत देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली.मात्र, या निर्णयामुळे शिवसेनेच्या काही मंत्र्यांमध्ये अंतर्गत नाराजी पसरल्याची माहिती आहे. ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे जनसामान्यांमध्ये, विशेषतः भूमिपुत्र आणि मराठी माणसांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची भावना या मंत्र्यांची असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित सरकारचा समन्वय आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी मुदतवाढीचा निर्णय, हे दोन मुद्दे उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त होणार का? या दोन मुद्द्यांवरून सरकारमध्ये घमासान होणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.