रश्मी ठाकरेंच्या जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी

रश्मी ठाकरेंच्या जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद आता धोक्यात आलं आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवकपदही रद्द होण्याची शक्यता आहे. विशाखा राऊत यांच्याकडे आता अपील करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत आहे.विशाखा राऊत या माजी महापौर असून त्या 191 क्रमांकाच्या वॉर्डमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव करून निवडून आल्या आहेत. त्यामुळे विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार आहे.

दरम्यान, विशाखा राऊत यांच्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. अनिल परब यांच्याकडून कायदेशीर माहिती घेतली जात असल्याची माहिती आहे. विशाखा राऊत या मातोश्री आणि विशेषतः रश्मी ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांचं नगरसेवकपद रद्द झाल्यास मातोश्रीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय आता महापालिकेच्या सभागृहासमोर येणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, विशाखा राऊत यांनी आपल्याकडे आजोबांच्या काळापासूनचे जात प्रमाणपत्राचे पुरावे असल्याचं सांगितलं आहे. तसेच पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निर्णय देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झालं, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर यांना उर्वरित कालावधीसाठी नगरसेवकपदाची संधी मिळू शकते, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता कोणतं पाऊल उचललं जातं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, 16 जानेवारी 2026 रोजी सदर निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलं होतं. सदर निवडणुकीतील त्यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी उपविभागीय अधिकारी, पालघर यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात आली.

अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि वंशावळीसोबत चैताली जितेंद्र राऊळ, अमृता जितेंद्र राऊळ आणि विराट जगदीश राऊळ यांचे कुणबी जातीचे वैधता प्रमाणपत्र जोडले होते. मात्र, सदर जात वैधता प्रमाणपत्रधारकांशी अर्जदाराचे पुराव्याअभावी रक्तनातेसंबंध सिद्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे मुद्दा क्रमांक 3 यास समितीने नकारार्थी उत्तर दिलं आहे.