रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिळवणी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षकपदाचा अनोखा अनुभव!

रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिळवणी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षकपदाचा अनोखा अनुभव!

तिळवणी :  . आर. तांबे  संचालित रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिळवणी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची अखंड ज्योत तेवत ठेवणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सोहळ्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष . आर. तांबे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अध्यक्ष . आर. तांबे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयी शैक्षणिक योगदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववीतील सर्व विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकांची भूमिका स्वीकारत अध्यापनाचा अनोखा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये काही तासिका घेऊन प्रत्यक्ष अध्यापन केले. शिक्षकाची भूमिका पार पाडताना त्यांना नियोजन, शिस्त, संयम, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यामागील मेहनत यांचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.

 

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी Principal आणि Vice Principal यांच्या भूमिकाही अत्यंत आत्मविश्वासाने साकारल्या. विद्यार्थिनी आराध्या अग्रवाल हिने Principal, तर विद्यार्थी शौर्य हळदकर याने Vice Principal यांची भूमिका समर्थपणे पार पाडली. त्यांनी शाळेतील शिस्त, नियोजन आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांचा अनुभव घेत आपल्या भूमिका अत्यंत कौशल्यपूर्ण जबाबदारीने पार पाडत नेतृत्वगुणांची प्रभावी झलक दाखवून दिली.

 

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी मनोगते व्यक्त करत गुरुजनांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता शब्दांतून व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान केला. तसेच कविता, भाषणे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून गुरु-शिष्य नात्याची सुंदर अनुभूती उपस्थितांना करून दिली.

 

या प्रसंगी व्यवस्थापकीय सदस्या सुप्रिया कौंदाडे मॅडम तसेच सर्व व्यवस्थापकीय सदस्य, Principal पद्मश्री पुरंत, Vice Principal सागर गिरीगोसावी यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा संस्कारांचा सदुपयोग करून जीवनात यशाची उंच शिखरे गाठण्याचे आवाहन केले. ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या गुरुजनांच्या कार्याला मानवंदना देणारा हा शिक्षक दिन तिळवणी येथे उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात अविस्मरणीय ठरला.