'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजातील लोकांना लक्ष्य करताय, खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा गंभीर आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्या हत्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. धीरज परदेशी यांच्यावर काम करत असताना हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धीरज परदेशी यांच्या कुटुंबीयांसोबत पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा आणि विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
संग्राम जगताप म्हणाले, “शुक्रवारी 7 ऑगस्टला धीरजसिंग राजपूत महापालिकेचं काम करत असताना हल्ला झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात संतापाची भावना पाहायला मिळाली. जिल्हा बंदची हाकही देण्यात आली. फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याची कुटुंबीयांची मागणी आहे. मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे.”
“पोलीसही हे प्रकरण वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहोत. आंदोलनानंतर पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली. अनधिकृत घरांना नोटीस देण्यात आली होती, मात्र त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्यामुळे सूत्रधार वेगळा आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही मिळाली पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं.
संग्राम जगताप पुढे म्हणाले की, “आरोपींच्या घरावर लावलेल्या नोटीसवर स्थगिती आहे. ती शासनाने उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. अल्पसंख्याकांच्या क्षेत्रात तो त्याच्या कामासाठी गेला होता. स्मशानाच्या ठिकाणी निर्जनस्थळी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजातील लोकांना लक्ष्य करत आहेत, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत. अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावं. सूत्रधाराला अद्याप अटक झालेली नाही. स्थानिक कार्यकर्त्यांवरच पोलीस गुन्हे दाखल करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.
धीरज राजपूत-परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद या तिघांना पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतलं होतं. या संशयितांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजामिया उर्फ अकरम याकुब सय्यद आणि वसीम रहिम सय्यद यांनाही नगरमधून अटक करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेचा वायरमन युनूस खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोप आणि दावे याबाबत पोलिसांच्या तपासातून नेमकं काय समोर येतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.




