विजय वडेट्टीवार शिंदे गटात जाणार? उदय सामंतांची मोठी ऑफर

विजय वडेट्टीवार शिंदे गटात जाणार? उदय सामंतांची मोठी ऑफर

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांनी वेग घेतला आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना जाहीरपणे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

उदय सामंत म्हणाले की, विजय वडेट्टीवार हे त्यांचे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जुने मित्र आहेत. पक्षप्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसली, तरी वडेट्टीवार यांच्यासारखा लोकांशी घट्ट नाळ जोडलेला आणि विदर्भातील प्रभावी नेता शिवसेनेत आला, तर त्याचा सर्वाधिक आनंद मलाच होईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतर आता 'ऑपरेशन टायगर 3'ची चर्चा सुरू झाली असून, ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या चर्चांवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दररोज पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षप्रवेशाला वेगळे नाव देण्यापेक्षा, अनेक लोकप्रतिनिधींना शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्याची इच्छा असल्याचे वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. अशा वेळी कोणी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.मात्र, विजय वडेट्टीवार यांच्याकडून अद्याप या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहणार की शिंदे गटात जाणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.