विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठाकरे बंधूंचा एल्गार; मोर्चाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठाकरे बंधूंचा एल्गार; मोर्चाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आता राजकारण तापलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 26 जुलै रोजी संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे.

आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांवरील कारवाईनंतर हा विषय केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीपुरता राहिलेला नाही, तर सरकारच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचला आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा काढण्यात येणार असून, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसून फक्त तिरंगा असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही सहभागी होण्याचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण उभं राहतं, हे या मोर्चातून स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना त्यांच्या सरकारच्या काळातील टीईटी घोटाळ्याचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा झाला होता. नापास उमेदवारांना पास करण्याचं काम त्या काळात झालं, असा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्या सरकारने परीक्षा होण्यापूर्वीच घोटाळेबाजांना पकडल्याचा दावा करत, "स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्यांवर बोट दाखवायचं थांबवा," असा टोला त्यांनी लगावला.

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ठाकरे बंधूंनीही इशारा दिला. हा मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडेल. मात्र, बाहेरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास कार्यकर्ते त्याला ठामपणे उत्तर देतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.