विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक रंगणार; नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की शिवसेनेचा नवा चेहरा?

विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक रंगणार; नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की शिवसेनेचा नवा चेहरा?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात पुढील आठवड्यात आणखी एक महत्त्वाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार असून हे पद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पदावर पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांची वर्णी लागणार का, की शिवसेना नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

महायुतीतील सत्तासमीकरणांनुसार विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर विधान परिषद सभापतीपद भाजपकडे आहे. त्यामुळे विधान परिषद उपसभापतीपद शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे.या पदासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून त्यांना यापूर्वीचा अनुभव असून गेली अनेक वर्षे त्या विधान परिषदेत शिवसेनेचं प्रभावी प्रतिनिधित्व करत आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्या सातत्याने भूमिका मांडत असतात. महिला प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या आणि अभ्यासू नेत्या अशी त्यांची ओळख आहे.

दरम्यान, विधान परिषदेत आणखी दोन मुद्द्यांवरही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नाव बदलून ‘अटल बिहारी वाजपेयी पार्क’ करण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. या नामांतराच्या प्रयत्नाला विरोध करत काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला असून सरकारला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे, राज्यातील बालमृत्यूचा मुद्दाही सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांनंतरही 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 12 हजार 792 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रश्नावर आमदार संजय खोडके सरकारचं लक्ष वेधणार आहेत.त्यामुळे विधान परिषदेचं आगामी अधिवेशन केवळ उपसभापती निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर गाजण्याची चिन्हं दिसत आहेत.