व्यवसाय मजुरी-घरकाम..बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द, समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदावरही संकट निर्माण झालं आहे. पालघर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं नसल्याचं समितीनं आपल्या आदेशात नमूद केलं आहे.विशाखा राऊत यांनी कुणबी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र सादर केलेल्या कागदपत्रांमधून कुणबी जात प्रमाणपत्रधारकांशी त्यांचं रक्ताचं नातं सिद्ध करता आलं नसल्याचं समितीने आदेशात म्हटलंय.

दरम्यान, या आदेशाविरोधात महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायद्यातील तरतुदीनुसार 90 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार आहे. त्यामुळे विशाखा राऊत यांच्याकडे या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे.विशाखा राऊत यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.
“विशाखा राऊत घरकाम करत होत्या? बाप रे? जातीचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी स्वत:साठी नाव लिहून सही करून सादर केलेली कागदपत्रे.. व्यवसाय - मजुरी, घरकाम..ओबीसी समाजावर अन्याय? माजी महापौर, माजी आमदार 60 वर्षे झाली तरी जून किती हवस?”, असा दावा समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केला आहे.दरम्यान, विशाखा राऊत यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्यास पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रिया सरवणकर होत्या. त्यामुळे विशाखा राऊत यांचं पद रद्द झाल्यास शिंदेंच्या शिवसेनेचं एक नगरसेवकपद वाढण्याची शक्यता आहे.16 जानेवारी 2026 रोजी सदर निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलं होतं. सदर निवडणुकीतील त्यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी उपविभागीय अधिकारी, पालघर यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात आली.
अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे, वंशावळ तसेच चैताली जितेंद्र राऊळ, अमृता जितेंद्र राऊळ आणि विराट जगदीश राऊळ यांचे कुणबी जातीचे वैधता प्रमाणपत्रे जोडली आहेत.परंतु सदर जात वैधता प्रमाणपत्रधारकांशी अर्जदाराचे पुराव्यांअभावी रक्तनातेसंबंध सिद्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे मुद्दा क्रमांक 3 यास समितीने नकारार्थी उत्तर दिलं आहे.




