सत्तेतील शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी; मनोज जरांगेंचं टीकास्त्र
मुंबई (प्रतिनिधी) : सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाची भाजपकडून कोंडी केली जात असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून काम करून घेतले आणि आता त्यांना ‘तुम्ही कुठेही जा, आम्हाला फरक पडत नाही’, अशा पद्धतीची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे भाजपकडून खूप हाल होत आहेत. फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंकडून त्यांचे काम करून घेतले. सत्तेत आल्यानंतर आता ‘तुम्ही कुठेही जा, आम्हाला फरक पडत नाही’, अशी भूमिका घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले.जरांगे यांनी एका व्यापाऱ्याचे उदाहरण देत सांगितले की, व्यापारी कवळी बसवण्यासाठी डॉक्टरकडे जातो आणि कवळी बसवून झाल्यानंतर ती नको म्हणतो. तशी अवस्था फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची केली आहे. ‘माझे काम झाले, तुला कुठे जायचे तिथे जा’, अशा पद्धतीने फडणवीस वागू लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सर्व पक्षांतील मराठा आमदार आणि खासदारांनी आता समाजासाठीच्या या लढाईत उतरले पाहिजे, अन्यथा जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. प्रश्न फक्त चार दाखल्यांचा होता. रद्द केलेले चार दाखले कॅन्सल करून चूक कबूल केली असती, तर ही वेळच आली नसती, असे ते म्हणाले.एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाने ही परिस्थिती समजून घ्यावी. सत्ता कायमची नसते; मात्र जनता एकदा दूर गेली तर पुन्हा कधीही निवडून येणार नाहीत, असा इशाराही मनोज जरांगे यांनी सत्तेत असलेल्या शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.
दरम्यान, धनगर समाजालाही अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, याला आपला पाठिंबा असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. गावोगावी धनगर समाज किंवा ओबीसी विरुद्ध मराठा समाज असे चित्र नाही. गोरगरीब ओबीसी समाजालाही ज्यांना कायद्याने कुणबी दाखले मिळत आहेत, ते मिळावेत असेच वाटते, असे सांगत त्यांनी विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांवरही जोरदार टीका केली.




