स्नेहसंमेलनातून मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ-नवोदिता घाटगे*
कागल (प्रातिनिधी) : स्नेहसंमेलन म्हणजे केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे प्रभावी व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले. कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर, हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच यशश्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

सलग तीन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी प्रादेशिक गीते, भारुड, ऐतिहासिक गीते, गौळण, शाळेचा माहितीपट, लावणी, नाटक, हिंदी व मराठी गीत गायन तसेच वादन अशा विविध कलाप्रकारांतून आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
नवोदिता घाटगे पुढे म्हणाल्या की, स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांच्या मेंदूला तल्लख करणारा तसेच शारीरिक हालचालींमधून त्यांचे आरोग्य जपणारा महोत्सव आहे. दैनंदिन अभ्यासात विद्यार्थ्यांना अधिक कार्यप्रवण व सर्जनशील बनवण्याचे महत्त्वाचे कार्य स्नेहसंमेलनातून घडते.
यशश्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनावेळी रोटरी इव्हॉल्व्ह क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा मयुरी पांजवाणी, उपाध्यक्ष श्वेता गांधी, खजिनदार निलाभ केडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक विभागाच्या स्नेहसंमेलनासाठी प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे तसेच आर.एल. तावडे फाउंडेशनच्या संस्थापिका शोभा तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा वृंदन घाटगे, सोनल कदम, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, संजय नरके, भाऊसाहेब कांबळे, सुजाता तोरसकर, रेखा पाटील, सेक्रेटरी विष्णू जत्राटे, श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ कागलचे संचालक युवराज पसारे, विजय बोंगाळे, टी.जी. आवटे, प्रशासन अधिकारी कर्नल एम. व्ही. वेस्विकर, राजे बँकेचे संचालक राघू हजारे, सुशांत कालेकर, अमोल शिवई, प्रवीण कुराडे तसेच टी.एन.सी. अकॅडमीचे प्रमुख तानाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. डी. खोत यांनी केले, तर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे. व्ही. चव्हाण यांनी आभार मानले.




