६ महिन्यांतच स्कॉर्पिओ नको, आता इनोव्हा हवी! मुंबई महापालिकेच्या वाहन खरेदीवरून नवा वाद
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ एन गाड्यांवर आता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या गाड्या प्रवासासाठी पुरेशा आरामदायी नसल्याची तक्रार पुढे येत असून, त्यांच्या जागी इनोव्हा क्रिस्टा गाड्या देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे.

याआधी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात, प्रशासकीय राजवटीच्या काळात महापालिकेने १३ नवीन वाहनांची खरेदी केली होती. त्यामध्ये महापौरांसाठी एक इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड, तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी १२ स्कॉर्पिओ एन गाड्या घेण्यात आल्या होत्या. या वाहनांवर एकूण २ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च झाला होता.
मात्र, आता सभागृह नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टा देण्याची मागणी केल्याने नव्या वाहन खरेदीची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासन लवकरच हा प्रस्ताव महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या निर्णयावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेल्या गाड्या बदलण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला. पालिकेच्या निधीचा अशा प्रकारे वापर करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
अवघ्या सहा महिन्यांतच नव्या वाहनांच्या खरेदीची तयारी सुरू झाल्याने मुंबई महापालिकेच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.




