ST प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढली

ST प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढली

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी प्रवासादरम्यान शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

यापूर्वी 1 ऑगस्टपासून एसटीच्या सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप कार्ड प्रत्यक्षात मिळालेले नसल्याने अंमलबजावणीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी 50 टक्के भाडे सवलत या योजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने मिळावा, यासाठी NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटीच्या सवलती या सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहेत. केवळ तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे कोणत्याही पात्र प्रवाशाला सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे अद्याप कार्ड न मिळालेल्या ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, वाढीव मुदतीचा लाभ घेत पात्र प्रवाशांनी शक्य तितक्या लवकर NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही सरनाईक यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यभरातील एसटी बसस्थानके आणि डेपोमध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कार्ड जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, आता 1 सप्टेंबरपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड काढण्याची संधी उपलब्ध असणार आहे.