आई-वडील शेतात, मुलं आंघोळीसाठी नदीवर; पाण्याचा अंदाज चुकला अन् तिघा चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

आई-वडील शेतात, मुलं आंघोळीसाठी नदीवर; पाण्याचा अंदाज चुकला अन् तिघा चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई-वडील शेतात धान रोवणीच्या कामात व्यस्त असताना आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुदैवाने बचावला. ही घटना शनिवारी दुपारी राणी खेडेगाव येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी गावाजवळील सती नदीवर आंघोळीसाठी गेले होते. मात्र नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (६), कुणाल रमेश दूधकवर (५) आणि मोहित हिवराज सराटे (११) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेदरम्यान त्यांच्यासोबत असलेला एक विद्यार्थी थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक शोध पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.

एकाच गावातील तीन निष्पाप चिमुकल्यांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने राणी खेडेगावसह संपूर्ण कुरखेडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोकमय वातावरण आहे.