गोकुळ'साठी सतेज पाटलांच्या जोडण्या ; थेट भाजप जिल्हाध्यक्षांची घेतली भेट; राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा

गोकुळ'साठी सतेज पाटलांच्या जोडण्या ; थेट भाजप जिल्हाध्यक्षांची  घेतली भेट; राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा

विशेष प्रतिनिधी / कोल्हापूर: गोकुळ दूध संघाची सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी कंबर कसली असून, गेल्या आठवडाभरापासून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. करवीर तालुक्याचा दौरा केल्यानंतर सतेज पाटील यांनी काल (२५ ऑगस्ट) शिरोळ तालुक्याचा दौरा केला. विशेष म्हणजे, या दौऱ्यात त्यांनी थेट भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या यड्राव येथील निवासस्थानी जाऊन गोकुळसंदर्भात गुप्त बैठक घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तीव्र चर्चांना उधाण आले असून, जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

 राजकीय जोडण्यांना वेग आणि बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती

आगामी 'गोकुळ' निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी राजकीय जोडण्या तीव्र केल्या आहेत. निंबाळकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस माजी आमदार राजूबाबा आवळे, दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगले, अमोल चौगले यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीकडून आगामी निवडणूक एकत्रित लढवण्याची चर्चा सुरू असतानाच, विरोधी पक्षातील नेत्याच्या घरी जाऊन सतेज पाटील यांनी केलेली ही भेट लक्षवेधी ठरली आहे.

 हायुतीमधील अंतर्गत वाद विरोधकांच्या पथ्यावर?

दुसरीकडे, भाजपनेही गोकुळ निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. नुकतीच शिरोळ तालुक्यात भाजपच्या संचालिका शौमिका महाडिक यांचीही बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीलाही राजवर्धन नाईक निंबाळकर उपस्थित होते. जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढवणार असे वरवर सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात महायुतीमधील अंतर्गत सुंदोपसुंदी आणि वाद लपून राहिलेले नाहीत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अजूनही शमलेला नाही. तसेच महायुतीत 'मोठा भाऊ कोण?' यावरून रंगलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे महायुतीमधील ही गटबाजी आणि डोकेदुखी आगामी निवडणुकीत विरोधकांच्या पथ्यावर पडणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.