ताराबाई पार्कमधील उदय शिंदे यांच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अखेर महापालिकेची नोटीस

ताराबाई पार्कमधील उदय शिंदे यांच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अखेर महापालिकेची नोटीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ताराबाई पार्क परिसरातील सामाईक मिळकतीमध्ये सुरू असलेल्या उदय शिंदे यांच्या कथित बेकायदेशीर कंपाउंड बांधकाम प्रकरणी  अखेर कोल्हापूर महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. नगरसेविका दिपाली राजेश घाटगे यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

नगरसेविका दिपाली घाटगे यांनी दिलेल्या निवेदनात, ताराबाई पार्क परिसरातील सामाईक जागेत आवश्यक परवानगी न घेता बेकायदेशीर कंपाउंड बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. नगररचना विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसतानाही काही अधिकारी व अभियंत्यांच्या संगनमताने काम सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

या प्रकरणात राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सिद्धार्थ शिंदे व त्यांचे वडील उदय शिंदे यांनी संबंधित अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला होता. तसेच, इतर जागामालकांची संमती न घेताच हे बांधकाम करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. भविष्यात वाद निर्माण होऊ नयेत यासाठी जागेची संयुक्त पाहणी करून तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घाटगे यांनी केली होती.

दरम्यान, या प्रकरणी आता कोल्हापूर महानगरपालिकेकडून उदय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेने १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले असून, २४ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नगररचना विभागात सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधित बांधकामावर पाडकामासह पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.