देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी; भाजपकडून कारणे दाखवा नोटीस?

देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी; भाजपकडून कारणे दाखवा नोटीस?

मुंबई (प्रतिनिधी) : नागपुरातील भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात, अर्थात नागपुरात, मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना आता नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.रविवारी सुरेश भट सभागृहात दिव्यांगांना साहित्य वाटप शिबिराचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात भाजपच्या 110 नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी तब्बल 40 भाजप नगरसेवकांनी कार्यक्रमाला दांडी मारली.

यानंतर अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय मनपा सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी घेतला आहे.दरम्यान, पूर्वसूचना देऊन आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करूनही 40 नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे आता या सर्व नगरसेवकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीसमधून अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

त्यामुळे भाजपकडून या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींना निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशभरात प्रसिद्ध झालेल्या जयपूर फूट आणि इतर दिव्यांग सहाय्यता साहित्यामुळे अनेक दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवणे शक्य झाले आहे. कृत्रिम पाय, हात तसेच अन्य कृत्रिम अवयव बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनातील विविध कामे अधिक सुलभपणे करता येतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होते.

भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती 1975 पासून देशात आणि देशाबाहेर दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंध आणि शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना विकलांग न संबोधता ‘दिव्यांग’ अशी सन्मानजनक ओळख दिली. दिव्यांगांच्या अडचणी शक्य तितक्या कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने शिबिरे आयोजित करून दिव्यांग व्यक्तींना आवश्यकतेनुसार श्रवणयंत्र, व्हीलचेअर, अंधांसाठी काठी तसेच इतर साहित्य आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींचे मानधन वाढवून ₹2,500 करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांना सन्मानाची संधी मिळावी यासाठी सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्णबधिर मुलांमध्ये लहान वयातच आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आल्यास त्यांची ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होऊ शकते.यासाठी ‘कॉक्लिअर इम्प्लांट’सारख्या शस्त्रक्रिया महत्त्वाच्या असून, या उपचारासाठी सुमारे ₹6 ते ₹8 लाख खर्च येतो. हा खर्च महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

भविष्यात राज्यभरात सर्वेक्षण करून विशेषतः 10 वर्षांखालील कर्णबधिर मुले आढळल्यास त्यांच्यावर योग्य वेळी आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.दिव्यांग व्यक्तींना दरमहा सुमारे ₹20,000 पर्यंत रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे, तसेच गृहनिर्माणासह विविध योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य मिळावे, यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.