मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; न आल्यास लायसन्सवर कारवाई! प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह महाराष्ट्रात आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी बोलता येत नसेल किंवा मराठीचे आवश्यक ज्ञान नसेल, तर संबंधित चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील अधिकृततेवर कारवाई होणार आहे. यासंदर्भातील महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे.महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी मराठीचे व्यवहारिक ज्ञान बंधनकारक करण्यात आले आहे.
नियम ४ मधील तरतुदीत ‘working knowledge of Marathi language’ ही अट स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसोबत मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.तसेच ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. संबंधित चालकाकडे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास, नियमांचे पालन न केल्याबद्दल परवाना प्राधिकरणाला कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
यानुसार, चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित अधिकृतता जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत निलंबित करता येणार आहे. त्यानंतरही चालकाकडून नियमांचे सातत्याने पालन होत नसेल, तर संबंधित अधिकृतता रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित नसून परमिटधारकांसाठीही मराठीचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. तसेच ॲप-आधारित मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करतानाही परमिटधारकाकडे मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.
याबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यापूर्वीही चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आला होता. सरकारच्या सूचनेनंतर अनेक चालकांनी मराठी शिकली आहे. मात्र अजूनही काही चालक मराठी शिकणार नसल्याची भूमिका घेत आहेत. अशा प्रकारची मग्रुरी मोडून काढण्यासाठी या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.




