नेतृत्वाला धार, प्रशासनाला शिस्त अन् जनतेच्या मनाला थेट भिडणारा नेता म्हणजे अजितदादा - शौमिका महाडिक
कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा हे केवळ एक नाव नाही, तर एक ठाम भूमिका आहे. उपमुख्यमंत्री म्हणून असो वा प्रशासक म्हणून कोणत्याही निर्णयांवरची त्यांची जबरदस्त पकड, कामातली गती आणि स्पष्टपणा हे नेहमीच वेगळेपण ठरले आहे. सर्वसामान्य माणसाला काय हवं आहे, त्यांच्या वेदना, अपेक्षांची अचूक जाण असलेले नेतृत्व. जनतेसाठी काम करताना संवेदनशील, पण निर्णय घेताना परखड. शब्दांत मिश्किलपणा असला तरी मत मांडताना ठामपणा आणि दिलखुलासपणा हे दादांचं वैशिष्ट्य असल्याच्या भावना शौमिका महाडिक यांनी व्यक्त केल्या.
शौमिका महाडिक पुढे म्हणाल्या, उत्कृष्ट वक्तृत्व, अनुभवातून आलेली राजकीय परिपक्वता आणि प्रशासनावरची मजबूत पकड यामुळे दादा हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व. प्रेमाने “दादा” म्हणावं असं नेतृत्व, जे कामाने बोलतं, आणि गरज पडल्यास स्पष्टपणे सुनावत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी अखंड झटणाऱ्या या नेत्याला मनापासून आदरपूर्वक श्रद्धांजली.




