पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शरद पवार आपल्या खास शैलीत म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शरद पवार आपल्या खास शैलीत म्हणाले...

मुंबई - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसावरही चर्चा झाली. देशभरात भाजपने मोठ्या उत्साहात पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा केला. विविध उपक्रम राबवले गेले. यावर शरद पवार यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना शरद पवार म्हणाले, “७५ वा वाढदिवस कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. मोदींनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं. मी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. आम्ही यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार घेतलेले लोक आहोत. अशा प्रसंगी आम्ही राजकारण बाजूला ठेवतो. त्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या, ते योग्यच आहे.”

शरद पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः च्या वाढदिवसाची आठवण करून दिली. “माझा ७५ वा वाढदिवस होता, तेव्हा नरेंद्र मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण बाजूला ठेवलं. आम्हीही तेच करत आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी एक मजेशीर प्रसंग घडला. पत्रकारांपैकी एका प्रतिनिधीनं पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख "शरद पवारांचे शिष्य" असा करताच पवारांनी तात्काळ प्रतिसाद दिला “मोदी माझे शिष्य? झोप झाली आहे ना तुमची?” त्यांच्या या मिश्किल उत्तरावर सभागृहात हशा पिकला.

दरम्यान, संघाच्या अलिखित परंपरेनुसार, वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्ती घ्यावी, असा संकेत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “मी ७५ वर्षांच्यानंतर थांबलो नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी थांबावं, असं सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही. मी आता ८५ वर्षांचा आहे,” असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं. या विधानातून शरद पवार गटाची पंतप्रधानांच्या निवृत्तीबाबत कोणतीही मागणी नसल्याचं स्पष्ट झालं आहे, जरी ठाकरे गट यावर ठाम भूमिका घेत असेल तरी.