पैशाच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून

पैशाच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : घरात ठेवलेले नऊ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडील दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) यांचा खून केल्याची धक्कादायक घटना शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडली. याप्रकरणी संशयित आरोपी संतोष दत्ताराम केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत दत्ताराम हे माजी सैनिक आहेत.

गावडी येथील दत्ताराम केसरकर हे उचत येथे राहतात. त्यांचा मुलगा संतोष याला दारूचे व्यसन आहे. तो गावडी येथे शेती करत होता. महिन्यातून एकदा घरी येत होता. गुरुवारी (दि. ११ ) गावडीहून उचत येथे आला होता. संतोष याने घरातील बॅगेत ठेवलेले पैसे न सापडल्याने पैशांबाबत चौकशी केली; मात्र घरातील कोणीही कबुली दिली नाही. 

यानंतर त्याने वडिलांवरच पैसे घेतल्याचा संशय घेतला. यावेळी वडील दत्ताराम केसरकर आणि त्याच्यात पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात संतोषने दगडी वरवंटा डोक्यात मारून वडिलांना गंभीर जखमी केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दत्ताराम केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला.