'माझा महाराष्ट्र न्यूज'चा दणका ! बालिंगा-दाजीपूर राज्यमार्गाच्या दुरवस्थेची बातमी दाखवताच कंत्राटदार खडबडून जागा
करवीर तालुका/प्रतिनिधी (विश्वनाथ मोरे) : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गाच्या दुरवस्थेबाबत आणि संथ कारभाराबाबत 'माझा महाराष्ट्र न्यूज'ने वृत्त प्रसारित करताच संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदार खडबडून जागे झाले आहेत. रस्ता अर्धवट असल्यामुळे वाहनधारकांसाठी बनलेला 'मृत्यूचा सापळा' आणि कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे वाभाडे चॅनेलने पुराव्यासह काढले होते. या बातमीचा थेट परिणाम (इम्पॅक्ट) आता पाहायला मिळत असून, पाडळी खुर्द ते बालिंगा दरम्यान उकरून ठेवलेल्या व खडी टाकलेल्या रस्त्याचे काम कंत्राटदाराने तात्काळ हाती घेतले आहे. आज या मार्गावर रोड रोलरच्या साहाय्याने खडी दाबून रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

काय होती परिस्थिती आणि 'माझा महाराष्ट्र'चा दणका
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू होते. पावसाळा सुरू होऊनही बिडशेड बाजारपेठ परिसरात रस्ता अपूर्ण असल्याने तिथे तळ्याचे स्वरूप आले होते. रस्त्यामध्ये उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्यांमुळे रोज लहान-मोठे अपघात होत होते. लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. हाच जनतेचा आक्रोश 'माझा महाराष्ट्र न्यूज'ने मांडला होता.
नागरिकांकडून चॅनेल आणि प्रतिनिधींचे कौतुक
लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्याने सामाजिक प्रश्नांची अत्यंत शिस्तबद्ध, मुद्देसूद आणि सडेतोड मांडणी करत 'माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेल' व करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे यांनी हा प्रश्न लावून धरला. चॅनेलच्या या रोखठोक पत्रकारितेमुळेच कंत्राटदाराला तातडीने काम सुरू करावे लागले. या मोठ्या यशानंतर पाडळी खुर्द आणि परिसरातील वाहनधारकांनी व ग्रामस्थांनी 'माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेल' आणि प्रतिनिधी विश्वनाथ मोरे यांचे मनःपूर्वक आभार मानून भरभरून कौतुक केले आहे.




