रामरक्षा आंदोलनावरून गोविंदगिरी महाराजांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान; 'रामरक्षा पूर्ण म्हणून दाखवा

रामरक्षा आंदोलनावरून गोविंदगिरी महाराजांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान; 'रामरक्षा पूर्ण म्हणून दाखवा

मुंबई (प्रतिनिधी) : रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोविंदगिरी महाराजांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. "उद्धव ठाकरेंना रामरक्षेचे शब्द आठवले, ही ईश्वराची कृपा आहे. पण आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी रामरक्षा पूर्ण आणि योग्यरीत्या म्हणून दाखवावी. त्यानंतर आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा विचार करू,"अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर हे आंदोलन राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही राबवण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिरातील कथित दानपेटी चोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस, आप आणि समाजवादी पक्षानेही आवाज उठवला असून, राज्यभर आंदोलन करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर बोलताना गोविंदगिरी महाराज म्हणाले की, राम मंदिरातील दान हे केवळ हिंदूंचे नसून अनेक मुस्लिम बांधवांनीही श्रद्धेने योगदान दिले आहे. मंदिर व्यवस्थापनावरही त्यांनी भाष्य करत काही नियुक्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ज्योती शंकराचार्य यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली. तसेच काँग्रेसवर निशाणा साधत, "राम मंदिराच्या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही," असे ते म्हणाले.

भाजपबाबत बोलताना गोविंदगिरी महाराज म्हणाले की, इतर पक्षांतील काही नेते भाजपमध्ये आल्यामुळे पक्ष काही प्रमाणात अशुद्ध झाला आहे. तसेच मंदिरातील चोरीप्रकरणी दोषींना प्रथम कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे, त्यानंतर प्रायश्चित्ताबाबत विचार करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.