विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'शाहू' चे उपक्रम कौतुकास्पद - शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत
कागल (प्रतिनिधी) - स्व.विक्रमसिंह घाटगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले. कलागुणांना वाव देण्याचा त्यांचा वारसा शाहू ग्रुपकडून त्यांच्या पश्चातही चालविला आहे हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी काढले. श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसाठी श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभावेळी सावंत बोलत होत्या. समारभांच्या अध्यक्षस्थानी 'शाहू' चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे होते.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखानाप्रणीत श्री छत्रपती शाहू कला,क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा सहा स्वतंत्र गटात घेण्यात आल्या होत्या. तर श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलतर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
सुवर्णा सावंत पुढे म्हणाल्या, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यावा. विद्यार्थ्यांनी कलेची जोपासना करताना त्यातील कौशल्ये आत्मसात करावीत.कागलची गुणवत्ता चांगली असून जिल्ह्यात अग्रेसर येण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन तर विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा.
अध्यक्षीय मनोगतात 'शाहू' चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले, स्व.राजेसाहेब यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने स्थापन केलेल्या शिक्षण संकुलचा विस्तार गुणवत्तापुर्ण शिक्षणामुळे झाला आहे.त्यांच्या पश्चात शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी यामध्ये भर घालत विद्यार्थ्यांना नव - नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
स्वागत व प्रास्तविक मुख्याध्यापक शिवाजी खोत यांनी केले. सुजाता सासमिले यांनी आभार मानले.
यावेळी 'शाहू' चे संचालक सचिन मगदूम संजय नरके,राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत,संचालक रणजीत पाटील, टी.जी.आवटे,रंगराव तोरस्कर,प्रशासन अधिकारी एम.व्ही.वेसवीकर,मुख्याध्यापिका जे.व्ही.चव्हाण आदी उपस्थित होते.
शाहू महाराजांचा शैक्षणिक वारसा समर्थपणे चालवूया..!
छ. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये बहूजनांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देणारा कायदा केला.त्यांच्या जन्मभुमीत आपण जन्मलो. शिक्षण घेत आहोत.त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत. त्यांचा शैक्षणिक वारसा समर्थपणे चालवूया असे आवाहन यावेळी शिक्षणाधिकारी सावंत यांनी केले.




