शेणगाव येथे पत्याच्या जुगारावर LCB ची धडक कारवाई ; चार जणांना अटक, १.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

शेणगाव येथे पत्याच्या जुगारावर LCB ची धडक कारवाई ;  चार जणांना अटक, १.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  शेणगाव (ता. भुदरगड) येथे पत्याचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई करत त्यांच्याकडून एकूण ₹१,७९,३६० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ₹७,३६० रोख रक्कम, चार मोबाईल हॅण्डसेट, दोन दुचाकी आणि जुगार साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर बंदोबस्त आणण्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सणगर गल्ली परिसरातील शिवाजी विठ्ठल सणगर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम “तीन पानाचा पलास” नावाचा पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने  छापा टाकला.

या कारवाईत राजेश विठ्ठल देसाई (रा. म्हसवे), बबन गणपती सातपुते (रा. लोटेवाडी), रविंद्र राजाराम लोहार (रा. आकुर्डे), आणि प्रविण मारुती कुंभार (रा. आकुर्डे) यांना ताब्यात घेण्यात आले. दोन जण पोलीसांची चाहूल लागल्याने पसार झाले.

शेडचा मालक शिवाजी विठ्ठल सणगर असून, संजय एकल यांनी जुगार खेळासाठी हे शेड भाड्याने घेतले होते, असे चौकशीत समोर आले. सर्वांवर भुदरगड पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी जालिंदर जाधव, तसेच पोलीस अंमलदार संजय देसाई, सतिश सुर्यवंशी, राजू कोरे, समीर कांबळे, हंबीरराव अतिग्रे व अमित मर्दाने यांच्या पथकाने केली.