"१२ वी PCB नंतर केवळ वैद्यकीयच नव्हे, तर इतर क्षेत्रांतही करिअरच्या अमर्याद संधी"; कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांचे प्रतिपादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : "१२ वी विज्ञान (PCB) नंतर केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे, तर हेल्थकेअर, अलाईड हेल्थ सायन्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्र हे भविष्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे," असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित "१२ वी PCB नंतरच्या करिअर संधी" या विषयावरील सेमिनारमध्ये ते बोलत होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सेमिनारला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजित पाटील (संचालक, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट) यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, संशोधन क्षेत्र आणि देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळातील नव्या क्षेत्रांचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी प्रास्ताविकात योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होईल, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी विद्यापीठातील विविध विभागांच्या प्रमुखांनी आपापल्या अभ्यासक्रमांची व अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली. सेमिनारनंतर विद्यार्थी आणि पालकांनी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब आणि प्रयोगशाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांशी संवाद साधला व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरज यादव व प्रा. मैथिली पाटील यांनी केले, तर डॉ. अजित पाटील यांनी आभार मानले.
यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, नर्सिंग प्राचार्य डॉ. उमाराणी जे., उपकुल सचिव संजय जाधव, जयदीप पाटील, यांच्यासह विद्यार्थी, पालक, विविध विभागांचे अधिकारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




