'अंधभक्त', 'इडियट' ते अमित शाहांवरील आरोप; राहुल गांधींच्या भाषणाने लोकसभा दणाणली, रिजिजू-बिर्लांनी वारंवार रोखलं
मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी विधेयकावरील चर्चेदरम्यान तब्बल 50 मिनिटांचे आक्रमक भाषण करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात त्यांनी 'इडियट' आणि 'अंधभक्त' या शब्दांचा उल्लेख केला, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गन वापरण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला.

राहुल गांधींच्या भाषणादरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदीय नियमांचा हवाला देत तब्बल सात वेळा हस्तक्षेप केला आणि राहुल गांधींनी पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी, अशी मागणी केली. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही वारंवार हस्तक्षेप करत संसदीय मर्यादांचे पालन करण्याचे निर्देश दिले. काही वेळासाठी राहुल गांधींचा माईकही बंद करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आक्षेपार्ह शब्द कामकाजातून वगळण्याची विनंती केली.
राहुल गांधी म्हणाले, देशाचे भविष्य रस्त्यावर उतरले आहे. हे विद्यार्थी राग किंवा द्वेषातून नाही, तर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. भाजप नेत्यांनी स्वतःच्या मुलांना विचारलं, तर त्यांनाही या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावासा वाटेल.
यावेळी त्यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून अमित शाह यांच्यावरही टीका केली. अमित शाह संसदेत येत नाहीत, कारण ते घाबरले आहेत. मी त्यांचा 30 गाड्यांचा ताफा पाहिला, ते त्यामध्ये थरथरत बसले होते, असा दावा त्यांनी केला. सभागृहाबाहेरही राहुल गांधी यांनी आपली भूमिका कायम ठेवत, दोनच शक्यता आहेत, एकतर गृहमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले किंवा त्यांना काहीच माहिती नव्हते. पहिल्या परिस्थितीत ते दोषी आणि दुसऱ्या परिस्थितीत अक्षम आहेत, असे वक्तव्य केले.
राहुल गांधींच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे
1. 'इडियट' आणि 'अंधभक्त'चा उल्लेख :
राहुल गांधी यांनी एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा संदर्भ देत 'इडियट' आणि 'अंधभक्त' या शब्दांचा वापर केला. या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सभापतींनी संबंधित शब्द कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.
2. पेलेट गन वापरावर अमित शाहांवर आरोप :
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गन आणि बळाचा वापर गृहमंत्र्यांच्या आदेशाने झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या आरोपावर किरेन रिजिजू यांनी पुरावे मागत माफीची मागणी केली.
3. शिक्षण व्यवस्थेवर RSSचा प्रभाव असल्याचा दावा :
राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्रालय प्रत्यक्षात RSS चालवत असल्याचा आरोप केला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा केवळ औपचारिक असल्याचे सांगत, देशातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूंवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
4. विद्यार्थी आंदोलनाचे समर्थन :
विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनात द्वेष नसून न्यायाची मागणी आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
5. पेपरफुटीवरून सरकारवर टीका :
एकामागून एक परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. लाखो रुपयांत पेपर विकले जात असल्याचा आरोप करत, तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.




