अंमली पदार्थ संदर्भात कृष्णराज महाडिक यांचे पोलीस महासंचालकांना निवेदन

अंमली पदार्थ संदर्भात कृष्णराज महाडिक यांचे पोलीस महासंचालकांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत महाराष्ट्रातील महाविद्यालयीन तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन दिले.

सध्या राज्यातील प्रमुख शैक्षणिक शहरांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणी ‘एम.डी.’ व इतर सिंथेटिक ड्रग्जचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक असून हा विषय केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून ‘नार्को-टेररिझम’शी संबंधित गंभीर राष्ट्रीय सुरक्षा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाने महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.

 या निवेदनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :

• महाविद्यालयीन मोहिमेसाठी अँटी-नारकोटिक्स विभागाकडून विशेष नोडल ऑफिसर नियुक्त करणे.

• प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी कॅम्पस अ‍ॅम्बेसेडर’ नियुक्त करण्यास परवानगी देणे.

• विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.

• ‘ड्रग्ज आणि नार्को-टेररिझम’ विषयावर कॉलेज कॅम्पसमध्ये जनजागृती सत्रे घेणे.

• पालकांसाठी विशेष मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे.

• युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा व क्रीडा संस्कृतीला चालना देणे.

यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत विषय गांभीर्याने विचारात घेण्याचे आश्वासन दिले.