अमरावती अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरण: डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पीडित कुटुंबाशी संवाद; 'फास्ट ट्रॅक' कारवाईची ग्वाही
अमरावती: अमरावती येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हळहळले आहे. या दुर्दैवी पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या प्रीती कुंबरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी दूरध्वनीवरून मुलीच्या वडिलांचे बोलणे करून दिले. डॉ. गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना धीर दिला, तसेच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

पीडित कुटुंबाची गोपनीयता राखण्याचे आवाहन
संवादादरम्यान पीडित वडिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, काही व्यक्तींकडून कुटुंबाची व गावाची खाजगी माहिती सार्वजनिक केली जात आहे. तसेच मुलीच्या आईचे फोटोही काही ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याप्रकारामुळे दुःखात अधिक भर पडत असून, कुटुंबाची ओळख आणि फोटो प्रसारित करण्याचे प्रकार तातडीने थांबवण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केली.
नशाखोरी व टवाळखोरीवर कठोर कारवाईची मागणी
परिसरात वाढलेली नशाखोरी, चौकाचौकांत बसून मुलींची छेड काढणारे आणि टिंगलटवाळी करणारे टवाळखोर या गंभीर समस्येकडेही वडिलांनी लक्ष वेधले. अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करून महिला व मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आरोपीला तात्काळ शिक्षेसाठी सक्षम सरकारी वकील
प्रकरणातील आरोपीविरुद्ध लवकरात लवकर दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करून खटला जलदगतीने चालवला जावा, अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली. यावर डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, ४ सप्टेंबर रोजी त्यांनी अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी चर्चा केली आहे. या खटल्यासाठी अनुभवी व सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, कुटुंबाला भविष्यात कोणत्याही मदतीसाठी थेट संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सादर करणार निवेदन
पीडित कुटुंबाच्या मागण्यांची दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश असेल:
* पीडित कुटुंबाची गोपनीयता राखणे व बदनामी थांबवणे.
* परिसरातील नशाखोरी आणि छेडछाडीविरोधात पोलिसांची विशेष मोहीम.
* खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला जलद व कठोर शिक्षा देणे.
संवेदनशील प्रकरणांमध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती प्रसारित करून पीडित कुटुंबाला त्रास देणे अत्यंत चुकीचे आहे. नागरिकांनीही परिसरात छेडछाड किंवा नशाखोरी दिसल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.




