अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये जपानी शिक्षणतज्ज्ञ कुनिओ हारा यांचे मार्गदर्शन

अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये जपानी शिक्षणतज्ज्ञ कुनिओ हारा यांचे मार्गदर्शन

वडगाव (प्रतिनिधी) : येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये द्वितीय वर्षातील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून त्यांच्यामध्ये प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि ध्येयदृष्टी निर्माण करण्याच्या उद्देशाने चार दिवसीय ‘प्रोफेशनल स्कील डेव्हलपमेंट कोर्स’ आयोजित करण्यात आला. यासाठी जपानमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, हो-मे-आय-कु फाउंडेशनचे संस्थापक कुनिओ हारा हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या शाखांमधील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. 

विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये, आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, प्रभावी संवादकौशल्य आणि सातत्यपूर्ण अध्ययनाची वृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुनिओ हारा यांनी विद्यार्थ्यांना स्व-जागरूकता, आत्मचिंतन, व्यक्तिमत्त्व विकास, ध्येयनिश्चिती, नेतृत्व, संघभावना आणि सकारात्मक संवाद यांबाबत कृतीआधारित मार्गदर्शन केले. पहिल्या दोन दिवसांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्व-मूल्यांकन, गटचर्चा आणि सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या क्षमता, मूल्ये, आवडी आणि भविष्यातील उद्दिष्टांचा शोध घेतला. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पष्ट दृष्टी, निश्चित ध्येय, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण कृती आवश्यक असल्याचा संदेश कुनिओ हारा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

पुढील दोन सत्रात विद्यार्थ्यांना दररोज स्वतःच्या प्रगतीचे परीक्षण करून सकारात्मक सवयी विकसित करण्यासाठी ‘कामी मेमो’ या स्व-विकास साधनाची माहिती देण्यात आली. तसेच कुनिओ हारा यांनी विकसित केलेल्या ‘हो-मे-आय-कु’ अर्थात कौतुकावर आधारित व्यक्तिमत्त्व विकास पद्धतीद्वारे स्वतःमधील आणि इतरांमधील चांगल्या गुणांची ओळख करून त्यांचे मनापासून कौतुक करण्याचे महत्त्व सांगितले. ‘फ्युचर सेल्फ टाइमलाइन’ या नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भविष्यातील स्वप्नांना वास्तववादी आणि साध्य करता येणाऱ्या ध्येयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी उद्दिष्ट तयार करणे, नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करणे, आवश्यक संसाधने व आर्थिक बाबींचे नियोजन करणे आणि सातत्याने प्रयत्न करणे ही यशाची मूलभूत सूत्रे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मूल्यांची जाणीव, जीवनातील उद्देश, शिस्तबद्ध अभ्यास, सामाजिक मूल्यनिर्मिती आणि दीर्घकालीन करिअर नियोजन यांवरही भर देण्यात आला. तसेच टीम-बिल्डिंग, ट्रस्ट-बिल्डिंग, मुलाखत कौशल्य आणि संवादात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता, सहकार्य, परस्पर विश्वास, आत्मविश्वास आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित होण्यास मदत झाली.

या चार दिवसीय प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना स्व-विकास, ध्येयनिश्चिती, वेळेचे नियोजन, प्रभावी संवाद, नेतृत्व, संघभावना, सकारात्मक मानसिकता आणि करिअर नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या व्यावहारिक पद्धतींचे ज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखून शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांकडे आत्मविश्वासाने, शिस्तबद्धपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाली. 

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, संचालिका मनीषा माने, कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. प्रवीण घेवारी, संचालिका प्रा. डॉ. संगीता चौगुले आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. विनया ठोंबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयातील सर्व डीन, विभागप्रमुख, शिक्षक प्रतिनिधी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.