अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये "नवसंवाद २०२५" या अनोख्या व्याख्यानमालेचे उद्घाटन संपन्न

अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये "नवसंवाद २०२५" या अनोख्या व्याख्यानमालेचे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये "नवसंवाद २०२५ सन्मान नारी शक्तीचा.. जागर विचारांचा.." या नवरात्रीनिमित्त आयोजित अनोख्या व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डॉ. एस. आर. चौगुले होत्या. विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या ९ महिलांचा सन्मान आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्यांचे मार्गदर्शन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

नवसंवाद व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार यांनी पहिले पुष्प गुंफले. प्रमुख वक्त्या म्हणून "इतिहासातील महिलांचे योगदान आणि सध्याची आव्हाने" या विषयावर बोलताना डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, "काळाच्या पुढचे विचार मांडणाऱ्या स्त्रिया इतिहासात झाल्या. भविष्याचा वेध घेण्यासाठी कर्तृत्ववान महिलांचा इतिहास जाणून घ्या. भारतीय संस्कृती सुजलाम-सुफलाम करण्यासाठी महिलानींच पुढाकार घेतला. विद्यार्थीनींनो, आपल्यातील आत्मसन्मान, स्वावलंबन, आत्मविश्वासाचा जागर करणे गरजेचे आहे. माणसातूनच दैवत्व निर्माण होते. सध्याच्या काळात विविध आव्हानांना सामोरे जाताना; समोर आलेला 'औरंगजेब' ओळखण्याची गरज आहे. त्यावर मात करण्याची धमक महिलांमध्ये असली पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली."

व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थिनींशी संवाद साधताना जि. प. माजी सदस्या मनीषा माने म्हणाल्या, "नवसंवादाद्वारे होणारा वैचारिक जागर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरु शकतो. व्याख्यानमालेतील प्रत्येक विचार हा आपले जीवन समृध्द करेल, आपल्याला दिशादर्शक ठरेल."

अध्यक्षस्थानावरुन बोलताना संचालक प्रा. डॉ. एस. आर. चौगुले म्हणाल्या, "नवरात्रीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या निमित्ताने सर्व विद्यार्थिनींनी आपली विचारप्रणाली प्रगल्भ करावी आणि त्याचा उपयोग करिअर बांधणीसाठी करावा. प्रचंड इच्छाशक्तीने कार्यरत राहावे." 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. गणेश लोळगे यांनी केले. नवसंवाद उपक्रमांतर्गत शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योग, वैद्यकीय, संशोधन, कायदा आदी क्षेत्रातील महिलांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार यांनी सांगितले. डीन स्टुडंट अफेयर्स डॉ. जे. एम. शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी समन्वयक प्रा. एस. व्ही. सागावकर, यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.