इथेनॉलमुळे ऐन सणासुदीत साखरेचे भाव वाढले? केंद्र सरकारने केला खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : साखरेपासून इथेनॉलच्या उत्पादनामुळे साखरेच्या किमती वाढल्या असल्याचा दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, कमी उत्पादन, सणासुदीच्या काळातील वाढती मागणी आणि साठेबाजीमुळे साखरेच्या किमती वाढल्या आहेत. वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी साठा मर्यादा आणि शुल्कमुक्त आयातीसारखे उपाय करण्यात आले आहेत.

मंत्रालयाने म्हटलं आहे की, साखरेच्या वाढत्या किमतींना इथेनॉल उत्पादनातील वापराशी जोडणं पूर्णपणे चुकीचं आहे. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉल उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या साखरेचा वाटा 2022-23 हंगामातील 12 टक्क्यांवरून 2025-26 हंगामात अंदाजे 9 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.
सध्या देशाच्या एकूण इथेनॉल उत्पादनापैकी अंदाजे 75 टक्के उत्पादन धान्यांपासून, प्रामुख्याने मक्यापासून होत आहे. भारतात दरवर्षी अंदाजे 32-34 दशलक्ष टन साखरेचं उत्पादन होतं. यापैकी 28-29 दशलक्ष टन अतिरिक्त उत्पादन शिल्लक राहतं.पूर्वी ही अतिरिक्त साखर कारखान्यांमध्येच अडकून राहत होती. त्यामुळे कारखान्यांचा निधी अडकत होता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यात अडचणी येत होत्या. आता सरकार या अतिरिक्त साखरेचा आणि उसाचा वापर करून इथेनॉल तयार करत आहे, ज्याचा वापर पेट्रोलमध्ये केला जातो.
साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारने साखर व्यापारी आणि वितरकांवर साठवणुकीची मर्यादा लागू केली आहे. नवीन नियमांनुसार, दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा व्यवहार करणारे व्यापारी 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साखर साठवून ठेवू शकणार नाहीत.याशिवाय आणखी तीन महत्त्वाचे उपाय करण्यात आले आहेत. कच्च्या साखरेच्या आयातीवरही शुल्कमुक्ती देण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांसाठी 400 टन साठ्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कारखान्यांना 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.लवकर गाळप सुरू झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये साखर उत्पादन 10 लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात केवळ 3 ते 4 लाख टन साखरेचं उत्पादन होतं.




