उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा विमान उपघातात मृत्यू
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या विमानाला बारामती येथे लँडिंगदरम्यान धक्का बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी बारामतीत येत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे रनवेवर उतरताना धक्का बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर विमानतळ परिसरात तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या.
दरम्यान, विमानाला नेमकं किती नुकसान झालं आहे आणि अपघाताचं कारण काय, याची माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी ते बारामती कडे येत होते. आज त्यांच्या सहा सभा बारामतीमध्ये होणार होत्या.
घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत चौकशी केली आहे. विमान वाहतूक विभाग आणि तांत्रिक पथकाकडून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पार्श्वभूमी -
जन्म - 22 जुलै 1959
वयाच्या 66 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले.
22 जुलै 1959 साली जन्मलेले अजित पवार यांचा राजकारणात मोठा दबदबा होता. 1982 साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असे नाव होते ज्यांनी अनेक दशकं सत्ता आणि संघटना दोन्हीवर मजबूत पकड राखली. अजित पवार यांनी 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात लवकरच स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्ष आणि नंतर फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक वेळा झालेले उपमुख्यमंत्री होत. त्यांच्या मागे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, जय व पार्थ पवार ही त्यांची दोन मुले.
भल्या पहाटे उठून काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचं हमखास नाव घेतलं जायचं. 7 वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे होता. प्रशासनावर असलेला त्यांचा वचक आणि राजकारणतला त्यांचा दबदबा सर्वश्रुत होता.
शरद पवार यांच्या सरकारमध्ये मिळाली मोठी जबाबदारी
1993 साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजित पवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतरही ते सरकार आणि संघटनेत महत्त्वाच्या भूमिका बजावत राहिले. 2010 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांचा राजकीय लौकिक आणखी वाढला. या काळात ते राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले. राजकारणाव्यतिरिक्त, अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातही मोठा प्रभाव होता. ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
जुलै 2023 पुन्हा सांभाळली उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी
अजित पवार यांनी जुलै 2023 पासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. या भूमिकेत त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक अस्तित्व प्रस्थापित केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक कुशल रणनीतीकार आणि मजबूत प्रशासक मानले जात होते.




