एखादा हनुमान येईल आणि दाढी जाळून टाकेल; ६ खासदारांच्या विलीनीकरणानंतर संजय राऊतांचा शिंदेंवर जहरी वार

एखादा हनुमान येईल आणि दाढी जाळून टाकेल; ६ खासदारांच्या विलीनीकरणानंतर संजय राऊतांचा शिंदेंवर जहरी वार

मुंबई: ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केलेल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. "एक दिवस एखादा हनुमान येईल आणि ही दाढी जाळून टाकेल," अशा बोचऱ्या शब्दांत राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.

गेल्या महिन्यात २२ जून रोजी ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, ज्याला एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर' म्हटले होते. यावर ठाकरे गटाने खासदारांना कायदेशीर नोटीस बजावून अपात्रतेचा इशारा दिला होता; मात्र लोकसभा सचिवालयाने या गटाला अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयावर एकनाथ शिंदेंनी आनंद व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

संजय राऊत म्हणाले, "दाढी राखली म्हणजे कोणी आचार्य विनोबा भावे होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे जे काही बोलतात, ते अंतिम सत्य किंवा नीतिमत्तेचे आहे असे मानण्याची गरज नाही. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या ६ खासदारांना ५०-५० कोटी रुपये देऊन विकत घेण्यात आले आहे. हे लोक निर्लज्ज आणि गद्दार आहेत. यात कसली मर्दुमकी आणि शौर्य आहे? जनतेने मतदान उद्धव ठाकरे आणि मशालीला केले होते, शिंदे यांच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही."

उपमुख्यमंत्री शिंदेंवर थेट निशाणा साधत राऊत पुढे म्हणाले, "दाढीवर हात फिरवून त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवण्याचा प्रयत्न करू नये. त्यांची नीतिमत्ता अमित शाह यांच्या चरणी गहाण पडली आहे. लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आहे आणि हे लोक लोकशाहीचे सिरियल किलर आहेत. आज सर्वसामान्य जनता अन्न-पाण्यासाठी आणि शिक्षणासाठी उपोषणाला बसली आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपये देऊन माणसे विकत घेतली जात आहेत," अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.