अंबादास दानवे उमेदवार; सुषमा अंधारे प्रतिक्रिया, उद्धव ठाकरें व्हिडिओ शेअर

अंबादास दानवे उमेदवार; सुषमा अंधारे प्रतिक्रिया, उद्धव ठाकरें व्हिडिओ शेअर

मुंबई (प्रतिनिधी) : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद  निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा होत असून भाजपने प्रज्ञा सातव यांच्यासह 6 नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील विधानपरिषद निवडणुकांसाठी नाव जाहीर करण्यात आलं. मविआचे उमेदवार म्हणून स्वत: उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची उमेदवारी घ्यावी, असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेककडूनही केला जात होता. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीवर असलेलं नाव मागे घेत स्वत: उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं. या स्पर्धेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यातच, या घोषणेनंतर सुषमा अंधारेंनी आपली भूमिका मांडली आहे. 

''आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान'', असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एकप्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमवेतचा व्हिडिओ शेअर करत, उद्धव ठाकरेंशी असलेलं नातंच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमधून सूचवलं आहे. उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी शेअर केला आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या 6 उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना होती. त्यातच, आज ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर करत अंबादास दानवेंना दुसऱ्यांदा संधी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे यांचेही नाव आघाडीवर होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे, अचानक त्यांची नावाची घोषणा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ठाकरेंकडून अंबादास दानवेंचं नाव जाहीर करण्यात आलंय. त्यानंतर, सुषमा अंधारेंनी एका ओळीत आणि व्हिडिओतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.