'ऑपरेशन टायगर-3'वरून भास्कर जाधवांचा शिंदे सरकारवर निशाणा

'ऑपरेशन टायगर-3'वरून भास्कर जाधवांचा शिंदे सरकारवर निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)चे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ऑपरेशन टायगरचा वारंवार उल्लेख होत असल्याने, "खरे टायगर आमच्या शिवसेनेत आहेत," असा दावा त्यांनी केला.

याचवेळी त्यांनी वारीच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा साधला. वारी हा श्रद्धा आणि भावनेचा विषय असताना सरकारने आर्थिक मदतीच्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. वारकऱ्यांविषयी सेवाभाव असण्याऐवजी सत्तेचा विचारच सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावरही भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला. भातखळकर यांनी पूर्वी केलेल्या राजकीय भूमिकांचा उल्लेख करत, निष्ठेवर भाष्य करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, भाजपकडून विरोधकांवर सातत्याने टीका केली जाते, मात्र स्वतःवर टीका सहन केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका करत सत्तेचा अहंकार वाढल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरूनही सरकारला त्यांनी लक्ष्य केले.

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते. आता पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर-3'च्या मुद्द्यावरून भास्कर जाधवांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्याने राज्यातील राजकारण आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.