ओयो रूमबाबत नियम आणखी कडक होणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत; विश्वास नांगरे पाटलांचं केलं कौतुक, म्हणाले...
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात झपाट्याने वाढलेल्या ओयो या ऑनलाइन हॉटेल आणि रूम बुकिंग सेवेबाबत राज्य सरकारकडून आणखी कडक नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. याच दिशेने नागपूरमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. याबाबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.ओयोबाबत आगामी काळात कठोर पावलं उचलली जाण्याचे संकेत यामुळे मिळत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ओयोच्या ठिकाणी लोक येतात, या विषयावर माझी पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती. त्यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला आहे.

यासाठी विश्वास नांगरे पाटील यांचं अभिनंदन करतो. त्यांनी चांगली नियमावली तयार केली आहे. आता ओयो हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची सर्व नोंद ठेवावी लागणार आहे. तसेच 90 दिवसांचं सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करणं बंधनकारक असेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये जवळपास प्रत्येक दोन हॉटेलमागे ओयोचा बोर्ड दिसतो. हे बोर्ड नेमके कशासाठी लावले आहेत, याचीही तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी ओयोवर पोलिसांची करडी नजर असणार असल्याचे संकेत बावनकुळेंनी दिले.
नागपूर जिल्ह्याची सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा बिघडू नये, याची काळजी विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. त्यामुळे नागपूरमध्ये तयार करण्यात आलेली ही नियमावली आगामी काळात राज्यभरातील ओयो रूम बुकिंग सेवेसाठी लागू केली जाणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबतही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं. सध्याच्या परिस्थितीत मनोज जरांगे काय करतात किंवा त्यांची भूमिका काय आहे, यापेक्षा राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अधिक महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईतील आंदोलनामुळे मुंबईकरांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय पाहता मुंबईत कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
राज्यातील सर्व आंदोलकांना विनंती आहे की, सध्याच्या काळात मुंबईत आंदोलन करणं राज्याच्या दृष्टीने योग्य नाही, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली जाणारी टीका-टिप्पणी महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नसल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं.




