काळजी घ्या, पण घाबरू नका; कोल्हापुरात पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज : खासदार शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील पूर नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारी घेतली असल्याचे स्पष्ट केले.

शाहू महाराज यांनी सांगितले की, संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ (NDRF) आणि प्रशासकीय यंत्रणेच्या टीम्स पूर्णपणे सज्ज आहेत. सध्यातरी नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपासून बरीच खाली असल्याने कोणतीही अडचण येणार नाही, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील धरणांच्या परिस्थितीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, धरणे एवढ्या लवकर पूर्ण भरत नाहीत. राधानगरी धरण साधारणपणे जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला भरण्याची अपेक्षा असते आणि इतर धरणे त्यानंतर भरतात. त्यामुळे धरण क्षेत्रात आता जरी चांगला पाऊस झाला, तरी धरणांमध्ये पाणी सोसण्याची (साठवून ठेवण्याची) क्षमता अजूनही शिल्लक आहे.
पूर आल्यास नागरिकांच्या आणि जनावरांच्या स्थलांतराबाबत प्रशासनाने आधीच सूचना जारी केल्या आहेत. कोणत्या भागातील व्यक्ती कोणत्या सुरक्षित ठिकाणी जाऊन राहणार, याचे अगदी व्यक्तीनिहाय सूक्ष्म नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाची पूर्वतयारी उत्तम असून नागरिकांनी काळजी नक्की घ्यावी, परंतु सध्या घाबरून जाण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही, असा विश्वास खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला.




