कोचिंग क्लासमधे आठवीतल्या मुलावर अत्याचार; पुण्यातील संतापजनक प्रकार
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयने स्टोअर रूममध्ये नेऊन या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केला असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हा कोचिंग क्लास आहे. या घटनेप्रकरणी ऑफिस बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. विकास गायकवाड असं 35 वर्षीय ऑफिस बॉयच नाव आहे. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही ऑफिस बॉयने काढले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता.

मागील दोन ते तीन वर्षापासून तो याच कोचिंग क्लासमध्ये रोज जायचा. याच दरम्यान ऑफिस बॉयने या आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला स्टोअर रूममध्ये घेऊन गेला. आणि त्याला अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑफिस बॉयने फोटो देखील काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आठवीतला मुलगा घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. क्लासला जायला नकार देत असल्याने वडिलांनी सगळी शहानिशा केली आणि क्लासमध्ये येऊन विचारपूस केली. त्यानंतर मुलानेच हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला आणि आई-वडिलांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता. मार्केट यार्ड पोलिसांनी या ऑफिस बॉयवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का? स्टोअर रूमसारख्या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था होती का? तसेच कर्मचाऱ्यांची पडताळणी योग्य पद्धतीने करण्यात आली होती का? याबाबत पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी क्लासमधील इतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू केली असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी आरोपी विकास गायकवाड याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी इतर कोणासोबत केले आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.




